भाषा निवडा:   English   |  मराठी

बुकिंगसाठी कॉल करा

+९१ ९११२०३६४६५, +९१ ९११२०३८४८५

" बाळ यांनी १९९५ मध्ये ६ एकर जमिनीवर फळबाग लागवड केली. बागेत असलेल्या पारंपरिक स्वरुपाच्या घरात मित्रमंडळी सुटीचा दिवस घालविण्यासाठी येत असत. त्यातूनच कृषी-आरोग्य पर्यटनाची कल्पना समोर आली. ते स्वत: आयुर्वेदाचे अभ्यासक असल्याने या प्रकल्पाची सुरूवात त्यांनी नक्षत्र उद्यानाने केली. विविध नक्षत्रानुसार झाडे लावून या झाडांभोवती बसण्यासाठी पाराची व्यवस्था करण्यात आली आहे. सुंदर गणेशमुर्तीच्या दर्शनाने 'चैतन्य सृष्टी' च्या भटकंतीला सुरूवात होते.

सुरुवातीला कार्यालय आणि भोजन व्यवस्थेची शेड आहे. या ठिकाणची बैठक व्यवस्था अत्यंत कल्पकतेने करण्यात आली आहे. लहान मुलांसाठी बैठ्या स्वरुपाच्या लहान खाटा असल्याने बच्चे कंपनीला भोजनाचा चांगला आनंद लुटता येतो. डाव्या बाजूला हिरडा, बेहडा, अश्वगंधा आदी विविध औषधी वनस्पतींची लागवड टायर्सच्या सहाय्याने केली. या टायर्सला छान रंग दिल्याने बागेत फिरताना सुंदर दृष्य पाहायला मिळतं. स्वयंपाक घराच्या मागच्या बाजूस पर्यटकांना पारंपरिक पद्धतीचे दळण-कांडण आणि चुलीवर स्वयंपाक करण्याचा अनुभव घेता येतो. ग्रामीण भागातील हा अनुभव पर्यटकांसाठी आगळावेगळाच असतो.

थोडं पुढे गेल्यावर पक्षी आणि प्राण्यांची दुनिया सुरू होते. गीझ, बदक, टर्की आदी बदकांचे सुंदर प्रकार लक्ष वेधून घेतात. जोडूनच गाईंचा गोठादेखील तयार करण्यात आला आहे. मोठ्या आकाराचा टर्की सहसा पहायला मिळत नाही. तो भांडकुदळ असल्याने त्याला बंद करून ठेवल्याची माहिती डॉ.बाळ यांनी दिली. बागेत विविधरंगी फुलांची झाडे वाटेच्या दोन्ही बाजूस लावली असल्याने बागेत फिरताना आल्हाददायक वाटते. त्यासोबतच नारळ, सुपारी, केळी, चिकू, पेरू, जाम, काजू अशी विविध फळझाडे बागेत पहायला मिळतात. मसाल्यांची विविध रोपेदेखील पर्यटकांना येथे पहायला मिळतात. बागेत कोणत्याही भागात जरी गेलात तरी सुमधूर संगीताचे हळूवार स्वर कानावर पडतात. त्यातून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो.

बागेसाठी पाणी ग्रॅव्हीटीने आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चार लाख लिटर क्षमतेची टाकी तयार करण्यात आली असून पर्यटकांना पाण्याशी खेळता यावे यासाठी तरण तलावाची व्यवस्थादेखील बागेत आहे. बागेत निवासासाठी पाच रूम्सची व्यवस्था आहे. रूम्समध्ये मराठी, हिंदी किंवा ताणतणाव व्यवस्थापनाचे संगीत यापैकी कोणतेही संगीत ऐकण्यासाठी 'स्थानिक एफएम' ची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सकाळी योगासने आणि रात्री आरोग्यविषयक संवाद आयोजित केला जातो.

ॲग्रो-हेल्थ टुरिझमची नवी संकल्पना मांडताना कोकणातील पर्यटनासाठी एक नवा पर्याय डॉ.बाळ यांनी या पर्यटन केंद्राच्या माध्यमातून दिला आहे. केंद्रातला कॉन्फरन्स हॉल, पारंपरिक पद्धतीचे उत्तम भोजन, शाकाहारी आणि मांसाहारी भोजन घेणाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था, विजेसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि रम्य परिसर यामुळे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण म्हणून दापोली परिसरात 'चैतन्य सृष्टी'ची ओळख आहे.

आपल्या व्यवसायातून वेळ काढून पर्यटन केंद्रातला निसर्ग फुलविण्याचे काम डॉ.बाळ अगदी मनापासून करतात. या केंद्रात येणारा पर्यटक हा जणू त्यांच्या घरचा पाहुणा आहे या पद्धतीने त्याच्याकडे लक्ष दिले जाते. भविष्यात याच परिसरात आरोग्य केंद्र उभारून पर्यटकांच्या विश्रांतीचे क्षण अधिक सुखद करण्याचा त्यांचा मानस आहे. कोकणी पदार्थांचे विक्री केंद्रही या परिसरात सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील निसर्गाचे संवर्धन करताना त्यातून पर्यटन व्यवसाय कसा समृद्ध करता येतो याचा आदर्श या केंद्राच्या रुपाने उभारला गेला आहे, असेच म्हणावे लागेल. "
डॉ.किरण मोघे

ठिकाण

चैतन्यसृष्टी कृषि पर्यटन
मु. पोस्ट. लाडघर, तालुका: दापोली,
जिल्हा: रत्नागिरी. पिन : ४१५ ७१२
महाराष्ट्र, इंडिया.

Copyright @ 2013 All Rights Reserved. Chaitanya Srushti, Ladghar Sitemap

Design & Developed By